आरोग्यसेवक पदभरतीतील उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळण्याची शक्यता | Arogya Sevak Bharti 2025

Arogya Sevak Bharti 2025: जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवक (५० टक्के) भरती झाल्यानंतरही अद्याप उमेदवारांना नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. या विलंबामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, त्यांनी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. आमदार मांगुळकर यांनी या प्रकरणाची दखल घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र लिहून तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच आरोग्य सेवकांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

भरती प्रक्रिया आणि नियुक्त्यांचा विलंब – Arogya Sevak Bharti 2025

जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील रिक्त पदे भरतीसाठी आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर बहुतांश उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र, पेसा क्षेत्रातील जागांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाले नव्हते. न्यायालयीन प्रक्रियेच्या अडथळ्यांमुळे उमेदवारांचा हिरमोड झाला. अखेर न्यायालयाने नियुक्त्या करण्याचे आदेश दिले, त्यानंतर ग्रामसेवक व काही आरोग्य सेवकांना नियुक्त्या देण्यात आल्या. मात्र, अद्यापही आरोग्य सेवक (५० टक्के) यांना नियुक्त्या न मिळाल्याने संतप्त उमेदवारांनी शासन आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

आमदार मांगुळकरांचा हस्तक्षेप

नियुक्त्यांबाबत पाठपुरावा करण्यासाठी काही उमेदवारांनी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांची भेट घेतली. त्यांनी रखडलेल्या नियुक्त्यांसाठी मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवून त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. या पत्रानंतर नियुक्त्या प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या पदांची टंचाई आणि प्रशासनाची जबाबदारी

२०१९ मध्ये सुरू झालेली आरोग्य सेवकांची भरती प्रक्रिया अनेक अडथळ्यांमुळे २०२४ मध्ये पूर्ण झाली. मात्र, काही मार्गदर्शक सूचनांवर आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयाने नियुक्त्यांवर स्थगिती दिली. यामुळे २६०० आरोग्य सेवकांची नियुक्ती रखडली. दरम्यान, २०२५ मध्ये चीनमधून HMPV विषाणूचा धोका असल्याचे लक्षात घेता आरोग्यसेवा संचालनालयाने ३ जानेवारी रोजी जिल्हा परिषदा आणि रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या. मात्र, ग्रामीण आरोग्य व्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेले आरोग्य सेवक अद्याप घरी बसलेले आहेत.

शासनाने तातडीने निर्णय घ्यावा

गेल्या पाच वर्षांपासून २६०० आरोग्य सेवकांच्या जागा रिक्त आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा, लसीकरण, सर्वेक्षण आणि मार्गदर्शनासाठी या पदांची तातडीने भरती होणे आवश्यक आहे. न्यायालयाच्या अधीन राहून सरकारने त्वरित उपाययोजना करून नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.