News

गोकुळचे चेअरमन डोंगळेशी आमदार आबिटकर समर्थकांची हमरीतुमरी | Gokul

कोल्हापूर | भेसळयुक्त दूध संस्थेच्या चर्चेवरून चेअरमन डोंगळे व गंगापुरातील महादेवराव महाडिक दूध संस्थेचे प्रतिनिधी, आमदार प्रकाश आबिटकर समर्थक तानाजी जाधव यांच्यात हमरीतुमरी झाल्याचे पहायला मिळाले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने गारगोटी येथे आयोजित केलेल्या भुदरगड तालुका दूध संस्था प्रतिनिधी संपर्क सभेत हा प्रकार घडला.

भुदरगड तालुक्यातील चार दूध संस्थांच्या भेसळयुक्त दुधावरून बराच वेळ वादविवाद व चर्चा झाली. त्यातील भेसळयुक्त दूध संस्थांचे संकलन तडकाफडकी बंद करण्याचा आदेश चेअरमन डोंगळे यांनी दिला. त्यामुळे संतापलेल्या सभासदांनी चेअरमन यांची हुकूमशाही चालणार नाही. दूध उत्पादकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा एकनाथ देसाई, तानाजीराव जाधव यांच्यासह सभासदांनी दिला.

गंगापूर येथील महादेवराव महाडिक दूध संस्थेचे प्रतिनिधी तानाजी जाधव या प्रकाराबाबत म्हणाले, चेअरमन डोंगळे यांची भाषा हुकूमशाहीची होती. प्रतिनिधी प्रश्न विचारताच त्यांना गप्प बसवत होते. आमच्या संस्थेचे नाव महाडिक आहे, यात आमची काय चूक? डोंगळेंची भाषा ही दादागिरीची होती. विशेष म्हणजे, जाधव यांनी आपण आमदार प्रकाश आबिटकर यांचा कट्टर समर्थक असल्याचे सांगितले.

यावेळी चेअरमन अरूण डोंगळे, माजी चेअरमन विश्वासराव पाटील, संचालक रणजितसिंह पाटील, संचालक राजेंद्र मोरे, अभिजित तायशेटे, संचालक किसनराव चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील, किसन चौगले, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, बाळासाहेब खाडे, चेतन नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, श्रीमती अंजना रेडेकर, युवराज पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले आदींसह संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button