कोल्हापूर: महावितरणच्या जनसंपर्क अधिकारी पदी विश्वजित भोसलेंची नियुक्ती
कोल्हापूर | महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांची कोल्हापूर परिमंडल कार्यालयात बदली झाली असून त्यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे. या आधी ते महाविरणच्या मुंबई येथील ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात कार्यरत होते. भोसले हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चिपरी येथील असून त्यांनी आपली पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापिठाच्या ‘पत्रकारिता व संवादशास्त्र’ विभागातून पूर्ण केले आहे.
महाविरणच्या ‘घारापुरी’ येथील समुद्र तळाखालून वीज वाहिनी टाकून बेटावरील ग्राहकांना वीज पुरवठा करण्याच्या महत्वाच्या प्रकल्पासाठी त्यांनी प्रभावी जनसंपर्क केला होता. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात या प्रकल्पाची दखल घेतली असून शासकीय जनसंपर्क क्षेत्रात भोसले यांची उल्लेखनीय कारकीर्द आहे. तसेच जुलै २०१९ मध्ये महालक्ष्मी ट्रेन वांगणी, कल्याण येथे पुराच्या पाण्यात अडकली असताना विश्वजीत भोसले यांनी प्रसंगावधानता दाखवत जनसंपर्काचा प्रभावी वापर केला होता. यामुळे प्रवाशांची ट्रेन मधील परिस्थिती प्रसार माध्यमांपर्यंत तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या विविध यंत्रणांपर्यंत पोहचून मदत मिळाली होती. या कामाची दखल घेत ‘पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया’ या जनसंपर्क क्षेत्रातील देशाच्या शिखर संस्थेने त्यांना राष्ट्रीय पातळीवर गौरवले आहे.
सध्या विश्वजीत भोसले जनसंपर्क क्षेत्राची मातृसंस्था असलेल्या ‘पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया’च्या मुंबई चॅप्टरचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत. पावसाळ्यात मुंबईत उद्भवणाऱ्या पूरसदृश्य परिस्थितीत महावितरणचे जनसंपर्क अधिकारी म्हणून विश्वजीत भोसले यांनी प्रभावी कार्य केले आहे.
भोसले हे मुळचे कोल्हापूरचे (मु.पो.चिपरी, ता.शिरोळ) असून त्यांनी आपली पदव्युत्तर पदवी शिवाजी विद्यापिठाच्या ‘पत्रकारिता व संवादशास्त्र’ विभागातून पूर्ण केली आहे. महावितरणमध्ये निवड होण्यापूर्वी भोसले यांनी कोल्हापुरातील विविध दैनिके व आकाशवाणी कोल्हापूर येथे काम केले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोल्हापूर प्रादेशिक विभागात जनसंपर्क सहाय्यक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरण आणि वीज ग्राहक यांच्यात संवादाचा पूल बांधण्यासाठी अधिक प्रभावीपणे जनसंपर्क कार्याची सेवा देण्याचा मानस त्यांनी यानिमित्ताने बोलून दाखवला आहे.