Anjali Damania : संतोष देशमुख हत्याप्रकरणात अंजली दमानिया यांचा आणखी एक गौप्यस्फोट, PCR ची प्रत शेअर करत म्हणाल्या… जीव वाचला असता!
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा असल्यामुळे त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सतत धमक्या, खंडणी, आणि अपहरणाची तक्रार करूनही वाल्मिक कराडवर कारवाई न झाल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सुनील केदू शिंदे यांनी केलेली पीसीआरची प्रतच समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.
सुनील शिंदे यांच्या पीसीआरचा उल्लेख
दमानिया यांनी सुनील केदू शिंदे यांनी केलेल्या पीसीआरची प्रत समाजमाध्यमांवर शेअर केली असून, “सुनील शिंदे यांची तक्रार वाचून मन अतिशय अस्वस्थ झाले,” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या माहितीनुसार, वाल्मिक कराड यांनी परळी कार्यालयात शिवाजी थोपटे यांना बोलावून धमकी दिली होती की, “केज तालुक्यातील अवादा कंपनीचे सर्व काम बंद करा अन्यथा काम चालू ठेवायचे असेल तर २ कोटी रुपये द्या.” तसेच, या प्रकरणावरून सुनील शिंदे यांचे २८ मे २०२४ रोजी अपहरण झाले होते, ज्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बीड पोलिसांवर प्रश्नचिन्ह
अंजली दमानिया यांनी बीड पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “जर वेळेत कारवाई झाली असती, तर संतोष देशमुख आज जिवंत असते,” असे त्यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, महेश केदार, आणि सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाईची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी भाजप आमदार सुरेश धस आणि इतर लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती.
संघटित गुन्हेगारीविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे संकेत
संघटित गुन्हेगारीचा प्रभाव कमी करण्यासाठी या प्रकरणातील आरोपींना मकोका अंतर्गत कडक शिक्षा दिली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.