मुंबई | राज्यातील प्रत्येक अंगणवाडीसाठी इमारत उपलब्धतेसह 17 हजार पेक्षा अधिक अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांची भरती (Anganwadi Bharti 2023) करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले. त्या नाशिक जिल्ह्यातील घोटी, तालुका इगतपुरी येथे राष्ट्रीय पोषण माह राज्यस्तरीय अभियानाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होत्या.
मंत्री तटकरे पुढे म्हणाल्या की, 0 ते 6 वयोगटातील बालकांचे संगोपन महत्वाचे असून सुपोषीत भारताची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये मांडली आहे. राज्यात गेल्या सहा वर्षापासून राबविण्यात येणाऱ्या पोषण माह उपक्रमात महाराष्ट्र राज्य हे देशात तिसऱ्या क्रमांकावर असून याचे पूर्ण श्रेय हे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना जाते. सुपोषीत भारत अंतर्गत राबविलेल्या विविध उपक्रमात नाशिक जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. अशा शब्दात मंत्री आदिती तटकरे यांनी उपस्थित सेविका व मदतनीस व जिल्हा प्रशासानाचे कौतुक केले.
बालकांच्या शिक्षणाचा पहिला श्रीगणेशा हा अंगणवाडीतूनच होत असून अंगणवाडी सेविका त्यांचा पहिला गुरू आहे. मुल जन्मास येण्यापूर्वी व जन्मास आल्यांनतरही माता व बालक यांच्या पोषण आहाराची काळजी अंगणवाडी सेविका या जबाबदारीने पार पाडत आहे. कोरोना कालावधीतही हातात थर्मामीटर व ऑक्सीमीटर घेवून गावातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीत या सेविका अग्रेसर होत्या. स्त्री हा कुटूंबाचा कणा असून ती स्वत: सुदृढ असेल तर तिचे कुटूंबही सुदृढ राहते.
डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून पुढील वर्षापासून दुसऱ्यांच्या आरोग्याची काळजी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मतदनीस यांच्या कुटूंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली.