अमृता फडणवीसांची उर्फीला साथ, चित्रा वाघ बॅकफूटवर | वाचा काय म्हणाल्या अमृता फडणवीस | Amruta Fadnavis on Urfi Javed

पुणे | महाराष्ट्रात सध्या उर्फी जावेदचे प्रकरण विशेष चर्चेत आले आहे. अभिनेत्री-मॉडेल उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, उर्फीवर कारवाईची मागणी वाघ यांच्याकडून केली जातेय. या दरम्यान उर्फी प्रकरणात गायिका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी उर्फी प्रकरणी त्यांनी आपले मत मांडले. यावेळी अमृता यांनी त्यांच्या अलीकडेच रीलिज झालेल्या पंजाबी गाण्याविषयीही भाष्य केले, मात्र त्यांनी उर्फीविषयी दिलेली प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे.

- उर्फी जावेदबाबत अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया
- उर्फी जे करतेय त्यामध्ये काहीच वावगं नाही- अमृता
- अमृता फडवणीसांनी उर्फीला दिला असा सल्ला

अमृता फडणवीस म्हणाल्या की, ‘प्रत्येकाचे विचार वेगळे असतात. चित्रा वाघ यांचे जे विचार आहेत ते त्यांनी प्रकट केले आणि त्याप्रकारे त्या अॅक्शनही घेत आहेत. माझा विचार असा आहे की, उर्फीने सार्वजनिक ठिकाणी आणि तिला व्यावसायिकदृष्ट्या जिथे कमिटमेंट नाही आहे अशा ठिकाणी ती संस्कृतीप्रमाणे राहिली तर चांगले आहे. एक स्त्री म्हणून मला असे वाटते की, ती स्वत:साठीच काहीतरी करते आहे त्यामुळे मला त्यात काही वावगं वाटत नाही.’

उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना डिवचले

राज्यात उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा वाद शमण्याचे नाव घेत नाहीये. चित्रा यांनी विविध ठिकाणी पत्रकार परिषदा घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली. महिला आयोगावरही टीका करत त्यांनी काही सवाल उपस्थित केले होते. शिवछत्रपतींच्या राज्यात असा नंगानाच चालू देणार नाही, असा इशारा वाघ यांनी दिला आहे. तर दुसरीकडे उर्फी जावेद ट्वीट आणि इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून वाघ यांना उत्तर देताना डिवचत आहे. सोमवारीही उर्फीने चित्रा यांना चिथवण्याचा प्रयत्न केला. तिने ‘मेरी डीपी इतनी ढासू, चित्रा मेरी सासू’ असं चिथवणारं ट्वीट तिने केलं. यानंतर मात्र चित्रा वाघ यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सामना करावा लागला.

सोशल मीडियावर अनेकजण उर्फीला पाठिंबा देत असून चित्रा वाघ आणि भाजपकडून हा मुद्दा अकारण उचलून धरला जात आहे, असा आरोप उर्फीला पाठिंबा देणारे करत आहेत. त्यातच भाजपच्याच अमृता फडणवीस यांनी उर्फीची पाठराखण केल्याने चित्रा वाघ यांची चांगलीच कोंडी झाली आहे.