कोल्हापूर | विविध धरणातून होत असलेला विसर्ग लक्षात घेउन पूराचा धोका टाळण्यासाठी अलमट्टी धरणातील विसर्ग (Almatti Dam Flow) बुधवारी तीन वेळा वाढवून सायंकाळी चार वाजलेपासून 75 हजार क्युसेक करण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुरपरिस्थितीतून दिलासा मिळाला आहे.
सध्या अलमट्टी धरणात पाणी पातळी 517.23 मीटर झाली असून गेल्या 10 तासांपासून 1,75,711 क्युसेकने धरणात पाण्याची आवक सुरु आहे. सध्या धरणातून 75 हजार क्युसेकने विसर्ग सुरु आहे. अलमट्टी धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आले आहे.
कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीच्या सातत्याच्या पाठपुराव्यानंतर कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून हा विसर्ग सुरू (Almatti Dam Flow) करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापुराचा धोका तूर्तास टळला असल्याचे बोलले जात आहे. तसेच सांगली, सातारा जिल्ह्यातील पूर देखील नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापुराची परिस्थिती लक्षात घेता अलमट्टी धरण व्यवस्थापनाने एका दिवसांत चार वेळा विसर्ग वाढवला आहे. सकाळी 15 हजार क्युसेक वरून 9 वाजता 30 हजार क्युसेक तर 1 वाजता 42 हजार 600 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला होता. तर दुपारी 4 नंतर तो 75 हजार क्युसेक्स करण्यात आला आहे.