बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती मुहूर्तावर राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा पॅटर्न! Shivsena VBA Alliance

मुंबई | राज्याच्या राजकीय पटलावर आता शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचा नवा पॅटर्न उदयास येणार आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषदेत घोषणा केली जाणार आहे. तसे स्पष्ट संकेत शिवसेनेच्या वतीनं आणि वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याकडून देण्यात आले आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. हाच मुहूर्त साधून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली जाणार आहे. तर दुसरीकडे आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे. 

आमचं मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी असल्याचं शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले. तर माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.

“वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीसोबतही जायला तयार आहोत. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला नाकारलं आहे. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ.” असे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

शिवशक्ती-भीमशक्ती युतीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे असं वक्तव्य शिवसेना नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी केलं होतं. युतीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे असून या युतीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही अंबादास दानवे म्हणाले.