मोठी बातमी : बदलापूर बलात्कारातील अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक; 5 पोलिसांवर ठपका | Akshay Shinde Encounter

Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळेतील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी (20 जानेवारी) सादर झालेल्या अहवालानुसार, अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. अक्षयच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 5 पोलिसांना जबाबदार धरत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

चकमकीचा दावा आणि वस्तुस्थिती – Akshay Shinde Encounter

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना मुंब्रा बायपासनजीक अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली व पोलिसांवर गोळीबार केला. स्वसंरक्षणासाठी केलेल्या प्रत्युत्तरात पोलिसांनी त्याला गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

मात्र, न्यायालयीन चौकशी अहवालात या दाव्याला छेद देण्यात आला आहे. अहवालानुसार, अक्षय शिंदेच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळले नाहीत, तसेच घटनास्थळावरील पुरावे पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभे करतात. पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे.

या अहवालात म्हटल्याप्रमाणे, अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे.

प्रकरणाची पार्श्वभूमी

बदलापूर पूर्वेतील आदर्श विद्यालय या शाळेमध्ये एका चार वर्षांच्या आणि एका सहा वर्षांच्या मुलीवर शाळेतील शिपाई म्हणून काम करणारा आरोपी अक्षय शिंदेने अत्याचार केला. लघुशंकेला घेऊन जाऊन या मुलींवर अत्याचार करण्यात आला. 12 ऑगस्ट रोजी एका मुलीसोबत दुष्कृत्य केले गेले, तर 13 ऑगस्टला आणखी एका दुसऱ्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला. या मुली शाळेत जायला तयार नसल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला.

दोन्ही पीडित मुलींच्या कुटुंबीयांनी 16 ऑगस्ट रोजी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी 12 तासांचा विलंब केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे. यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी बदलापूर स्थानक बंद ठेवत आंदोलन केले. तसेच आंदोलकांकडून आरोपीला फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या हवाली करा अशी मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली. 

“हा एन्काऊंटर, हा मर्डरच”, हायकोर्टाच्या आदेशानंतर अक्षय शिंदेचे वकील म्हणाले..

अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर झालं असून ही मर्डरच आहे, असा आरोप अक्षय शिंदेचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. “आम्ही क्रिमिनल रिटपिटीशन दाखल केली होती. त्यात आम्ही हा फेक एन्काऊंटर असून मर्डर आहे, असा दावा केला होता. गुन्हा दाखल करण्याची आणि कोर्टाच्या निगराणीखाली तपास होण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने स्टँड घेतला की, जोपर्यंत कस्टोडियल डेटची एन्क्वायरी करणारे न्यायदंडाधिकाऱ्यांचा रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत आम्ही पुढील स्टेप घेणार नाही, असा स्टँडच सरकारचा होता.

आज न्यायदंडाधिकाऱ्यांनी जो फायनल रिपोर्ट दिला, त्यात फेक एन्काऊंटर झालं असून ही मर्डरच आहे. आता सरकारच्या वकिलांनी सबमिशन केलंय की यात एफआयआर झालं पाहिजे”, असे अमित कटारनवरे यांनी म्हटले.

निष्कर्ष आणि पुढील कारवाई

चौकशी अहवालानुसार, अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी पाच पोलिस कर्मचारी जबाबदार आहेत. या प्रकरणाने पोलीस यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. न्यायालयीन कारवाईत यावर पुढील निर्णय होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सार्वजनिक संताप आणि न्यायाची अपेक्षा

या प्रकरणाने समाजात तीव्र संताप निर्माण केला असून, आरोपीला फाशी देण्याची मागणी झाली होती. परंतु, पोलिसांच्या वागणुकीमुळे हे प्रकरण अधिकच वादग्रस्त ठरले आहे.