News

चंदगड मतदार संघात अजितदादांचा उमेदवार ठरला; अजित पवारांच्या घोषणेमुळे महायुतीतील इच्छुकांची कोंडी | Ajit Pawar

कोल्हापूर | सध्या राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष विविध ठिकाणी आपले उमेदवार देखील जाहीर करताना दिसत आहेत. तर काही ठिकाणी काही जणांच्या उमेदवारांची संकेत दिले जात आहेत.

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाला कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पैकी किती जागा मिळतात याची उत्सुकता आहे. महिन्याभरापूर्वी कागल विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर आता चंदगड विधानसभा मतदारसंघातून आमदार राजेश पाटील यांना पुन्हा उमेदवारीचे संकेत दिलेत.

पुढच्या पाच वर्षांसाठी राजेश पाटील यांना पुन्हा विजयी करा असे सांगत अप्रत्यक्षपणे कोल्हापूर जिल्ह्यातून चंदगडचा दुसरा उमेदवारच त्यांनी जाहीर केला आहे. या मतदारसंघातून भाजपकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय शिवाजी पाटील, संग्रामसिंह कुपेकर हे इच्छुक आहेत. मात्र अजित पवारांच्या घोषणेमुळे महायुती मधील इच्छुकांची कोंडी निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची शुक्रवारी (ता.27) जनसन्मान यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघात आली आहे. आमदार राजेश पाटील यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या या जनसन्मान यात्रेत मतदारसंघातील अनेकांनी गर्दी केली आहे. मेळाव्यादरम्यान, चंदगड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अप्रत्यक्षपणे उमेदवाराची घोषणा केली आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार राजेश पाटील यांचे भाषणा दरम्यान कौतुक केले. आमदार कसा असावा तर राजेशसारखा असावा असे सांगत राजेश पाटील यांनी माझ्याकडुन 1600 कोटी रूपयांचा निधी चंदगड मतदारसंघात आणल्याचे स्पष्ट केले. अनेक योजनांच्या माध्यमातून निधी चंदगडला नेण्यासाठी राजेश यांनी माझ्याकडे आग्रह केल्याचेही पवार यांनी सांगितले.

Back to top button