मुंबई | एअर इंडिया कंपनीने आगामी काळात कर्मचारी भरतीची मोठी मोहीम हाती घेतल्याची माहिती आहे. आगामी काही महिन्यांत प्रत्येक महिन्याला कंपनी नवीन 500 कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे समजते.
येत्या वर्षभरात 900 नवे वैमानिक तर 4200 केबिन कर्मचारी भरण्याची प्रक्रिया कंपनीने यापूर्वीच सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीच्या मार्केट हिस्सेदारीत चांगलीच वाढ झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, कंपनीने विस्ताराची मोठी योजना हाती घेतली असून नव्या 470 विमानांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे. या खेरीज देशात नव्याने विकसित होणाऱ्या नव्या विमानतळांवर देखील कंपनीच्या सेवा सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीने कर्मचारी भरतीची मोठी मोहीम हाती घेतली आहे.
ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कंपनी अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणालीदेखील विकसित करत असल्याचे समजते. ही व्यवस्था कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांच्या बुकिंगची व्यवस्था किंवा एखादे वेळी विमान रद्द झाले तर त्वरित दुसऱ्या विमानाचे बुकिंग करणे आदी बाबी वेगाने करता येणार आहेत.