अहमदनगर | महापालिकेची रखडलेली पदभरती लवकरच होणार आहे. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. टीसीएस संस्थेशी यासाठीचा करार पूर्ण झाला आहे.
येत्या एक महिन्यात 134 कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या पदांची भरती प्रक्रिया होणार असल्याचे समजले. महापालिकेतील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी वानवा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन पदभरती झाली नव्हती. त्यामुळे महापालिकेच्या चार चार विभागाचा पदभार एकाच अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे अनेक कामे खोळंबत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
महापालिकेचे उत्पन्न आणि आस्थापनाप खर्च याचा ताळमेळ जुळत नसल्याने आणि आस्थापना खर्चचं 35 टक्क्यांच्या पुढे जात असल्याने नगरविकास विभाग महापालिका पदभरतीला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे आरोग्य, घनचकरा, उद्यान, विद्युत, अग्निशमन अशा अनेक विभागात गेल्या कित्तेक वर्षांपासून बाह्य संस्थेमार्फत कर्मचारी घेऊन कामकाज सुरू आहे. त्यात बाह्य संस्था वेळेत त्या कर्मचाऱ्याना पगार देत नसल्याने अनेक वेळा काम बंद होत असल्याने त्याचा मनपाच्या कामकाजावर परिणाम होत होता.
महालिकेत सध्या 2870 पदे मंजूर आहेत. तर सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे सुमारे 1200 कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. यापैकी अवघ्या 135 कर्मचाऱ्यांची भरती करण्यास शासनाच्या नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.
शासनाच्या मान्यतेनंतर कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला होता. त्याला कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, कंपनीने करारनाम्यात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटीची पूर्तता करून महापालिकेने करारनामा पुन्हा कंपनीकडे पाठविला असून, करारनामा पूर्ण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असल्याचे समजते.