Saturday, September 23, 2023
HomeBlogआदिपुरुषच्या मेकर्सचं काय चुकलं? वाचा.. | Adipurush Movie Review

आदिपुरुषच्या मेकर्सचं काय चुकलं? वाचा.. | Adipurush Movie Review

Trupti Sagar Deorukhkar यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

जिथे जावं तिथे लोक फक्त ‘आदिपुरुष’ची चर्चा करतायत, सोशल मिडीया तर खच्चून भरलाय..पण मी म्हणते काय चुकलं ‘आदिपुरुष’च्या मेकर्सचं? एवढंच चुकलं की त्यांनी फिल्म (Adipurush Movie Review) सुरु व्हायच्या आधी हे डिस्क्लेमर दिलं नाही की “आधी गेम ऑफ थ्रोन्स आणि मार्वेलच्या २-३ मुव्हीज बघून या”. हे सगळं पाहून गेलात ना की आदिपुरुषची लिंक लागते. रामायण वगैरेचा काय संबंध? ते तर स्वतः मुंतशीर सांगतोय की आम्ही रामायण बनवलंच नाहीए, फक्त प्रेरणा घेतलीए.. उगीच आपल्या तुमच्या लगेच भावना दुखावतात…

गेम ऑफ थ्रोन्समध्ये एक खलिसी आहे, जिच्याकडे एकूण ३ ड्रॅगन्स असतात. पैकी शेवटी फक्त एक शिल्लक राहतो आणि तिचा मृतदेह उचलून उद्विग्न अवस्थेत तो दूर उडून जातो. आता त्याच्या पुढचं कथानक इथे आहे. हा ड्रॅगन उडत उडत लंकेला जातो आणि ओम राऊतच्या स्टायलिश रावणाला भेटतो. रावण म्हणतो ‘उडत गेलं’ ते पुष्पक विमान आजपासून मी या ड्रॅगनवरुनच फिरणार. तो त्या ड्रॅगनचे एवढे लाड करतो म्हणून सांगू, स्वतः शिवभक्त, ब्राह्मण, प्रकांड पंडित असून सुद्धा स्वतःच्या हातांनी ड्रॅगनला मांस खाऊ घालत असतो. एवढं तर त्याच्या सख्ख्या आईने खलिसीने सुद्धा केलं नव्हतं हो! (Adipurush Movie Review)

गेम ऑफ थ्रोन्सच्या चाहत्यांनो यात ‘रेड वूमन’ सुद्धा आहे बरं का! फक्त ती लाल नाही तर सफेद कपड्यांत आहे. आणि ती बिभिषणाची बायको आहे, असं आपण सगळे मानू. कारण तसं काही स्पष्ट कोणी बोललं नाहीए. बरं तर ही मिस्ट्री वूमन बरं का ओम राऊतचा शेष (लक्ष्मण धरून चालू) मूर्च्छित झाल्यावर संजीवनी आणायला सांगते, त्याचं काहीतरी अजब रसायन बनवते आणि शेषला त्याचा सौना बाथ देऊन बरं करते. हा सीन पाहून डोळ्यांच्या कडा पाणावल्या, खरं सांगते!

बरं, ओम राऊतचा हा रावण राहतो कुठे? तर सोन्याच्या लंकेत नाही काही .. Thor Ragnarok या मार्वेल फिल्मच्या शेवटी थोरचं राज्य Asgard जळून खाक होतं आणि तो सगळ्या प्रजेला घेऊन तिथून निघून जातो. पुढे बराच वेळ हे राज्य जळत असताना ओम राऊतच्या रावणाच्या नजरेत भरतं. तो म्हणतो आजपासून हे काळंकुळकुळीत जळून खाक झालेलं राज्यच माझी लंका 2.0! इथे सोनं सोडाच, अशोक वाटिकेत एक हिरवं झाड काय दिसेल तुम्हाला, नुसती काळ्या झाडावर पांढरी फुलं! त्या रावणाचा मुलगा इंद्रजीत तत्कालीन ‘अ‍ॅक्वामॅन’ बनून फिरतोय. तो ही टॅटूज करायला बहुदा महेश चव्हाणकडे (जाऊन शोधा इंस्टाग्रामवर) जात असावा! जावेद हबीबने सुद्धा त्या काळवंटात सलून सुरु केल्यासारख्या सगळ्यांच्या हेअरस्टाईल्स एकदम चकाचक! मंदोदरीतर एकदम अ‍ॅडव्हान्स… नवरा युद्धाला निघाल्यावर ही आधीच सफेद साडी नेसून येते. जसं काय वाटंच बघतेय, “हे मरंल तर मी या KGF च्या काळ्या खाणीतून बाहेर तरी पडेन जरा!”

इथे दुसरीकडे वनवासाला सॅटीनच्या सुंदर साड्या मिरवत जानकी राघव, राघव करतेय. तेवढ्यात चितोरी सेना .. तीच एव्हेंजर्समध्ये दुसऱ्या ग्रहावरून आलेली असते, जिला परत पाठवताना आयर्न मॅन मरता मरता वाचतो आणि मग शावर्मा खायला घेऊन जातो सगळ्यांना.. हा, तर तीच चितोरी सेना राघववर आक्रमण करते आणि तो सिंगल हँडेडली सगळ्यांना संपवतो. तेही चेहऱ्यावरचा एकही हावभाव न बदलता….मज्जाय की नाही! उगीच आपलं त्या राघवला बघताना मनात मागून ‘ऐसा, रुद्र सा’ असं बाहुबलीचं गाणं वाजून जातं, मग स्वतःलाच जागं करत ‘अगं, हा बाहुबली नाहीए गं’ असं सांगावं लागतं. त्याने धनुष्याला प्रत्यंचा लावली की ‘बहिर्मुखं, नागद्वेयी, तेजा’ हे तुम्हाला आठवत नसेल तर ताबडतोब सिनेमागृहातून बाहेर पडा.

तुम्ही मार्वेलच्या फिल्म्स हिंदीत पाहिल्यात तर त्याच्याइतकं मनोरंजक दुसरं काही नाही. मग तिथे हे एव्हेंजर्स चक्क मराठी असतात, हरियाणवी असतात, पंजाबी असतात, काहीही बोलतात. त्याचाच धागा पकडून मुंतशीरने आदिपुरुषचे संवाद लिहिले आहेत. मग इथला रावण “और कोई कामधंदा नहीं हैं क्या”, असं सहज नाक्यावरचं वाक्य टाकतो. इतर आक्षेपार्ह आणि विनोदी संवादांवर आधीच सगळ्यांचा आक्षेप घेऊन झालाय आणि हे महत् कष्टाने लिहिलेले संवाद आता तुमच्या आततायीपणामुळे बदलावे लागणार आहेत.

क्लायमॅक्सवर काय लोक एवढे चिडतायत? भला मोठ्ठा गेमिंग कन्सोल लावल्याची मजा अनुभवता येते, त्याचं काही नाही यांना.. हा ग्राफिक्स नाहीएत चांगले गेम्स एवढे पण ठिकेय ना! ५००-६०० कोटीमध्ये थोडीच एकदम टॉपक्लास काही बनवता येतं? महागाई किती वाढलीए…ओम राऊत आणि त्यांच्या टीमने एवढी मेहनत केली ही फिल्म बनवण्यात की रिलीज करण्याआधी “एकदा आपण बघूया का” असं एकालाही वाटलं नाही. आणि जर त्यांनी बघूनही रिलीज केली असेल, तर बाबा रे भविष्यात तुझ्या फिल्म्स पाहण्याचे धाडस आमच्याने होईल असे वाटत नाही.

#Adipurush #adipurushmovie #AdipurushReview #आदिपुरुष

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular