विशाळगड प्रकरणी माजी खासदार संभाजी राजे यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या तरूणाला अटक
कोल्हापूर | विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनानंतर कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत गगनबावडा तालुक्यातील मुसलमानवाडी येथील एका तरूणानं माजी खासदार संभाजीराजे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. यामुळं गगनबावडा तालुक्यातील हिंदू समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
तालुक्यातील मुसलमानवाडी येथील एका तरूणानं संभाजीराजे यांच्याविषयी विशाळगड प्रकरणावरून वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळं गगनबावडा तालुक्यातील हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यानी साळवण पोलीस चौकीसमोर मोठी गर्दी केली होती. यावेळी आक्रमक झालेल्या हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार पोलिसांनी वादग्रस्त विधान करणाऱ्या तरूणाला अटक केली.
मुसलमानवाडी येथील तरूणानं वादग्रस्त वक्तव्य केल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर हिंदु समाजाच्या कार्यकर्त्यांनी निवडे साळवण येथील जोतिर्लिंग मंदिरात बैठक घेतली. त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तरूणाचा निषेध करत पोलिस चौकीसमोर जमून त्याला ताब्यात घेण्याची मागणी केली. तसेच वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जाहीर माफीनामा लिहून घ्यावा अशीही मागणी केली.
जमावाच्या मागणीनुसार पोलिसांनी या तरूणाला कळे येथून ताब्यात घेत अटक केली. त्यानंतर साळवण पोलीस चौकी समोर जमा झालेला जमाव निघून गेला. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात विशाळगड प्रकरणातून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने वादग्रस्त वक्तव्य टाळून सामाजिक सलोखा राखण्याचे आवाहन सर्व समाजांच्यावतीने केले जात आहे.