Saturday, September 23, 2023
HomeNewsठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत मोठी कपात; एस्कॉर्ट व्हॅनसह 'मातोश्री'वरील सुरक्षाही केली कमी

ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत मोठी कपात; एस्कॉर्ट व्हॅनसह ‘मातोश्री’वरील सुरक्षाही केली कमी

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेत अचानक कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याही सुरक्षेततही कपात करण्यात आल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अशा परिस्थितीत गृह खात्याकडून उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा यंत्रणेत कपात करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सुरक्षा रक्षकांना पोलीस ठाण्यात रुजू होण्याचे आदेश

ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी साधारणपणे 60 ते 70 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गुंतले होते. मात्र, आता या सर्वांनाच कमी करून पुन्हा पोलीस ठाण्यामध्ये रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. तसेच मातोश्रीवर असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक एस्कॅार्ट गाडी कमी केली असून पायलटही कमी करण्यात आला आहे. तसेच मातोश्रीवर असलेल्या एसआरपीएफची सुरक्षादेखील काढून टाकण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी उद्धव ठाकरे यांना झेड प्लस तर आदित्य ठाकरे यांना वाय प्लस सिक्युरीटी होती. मात्र, आता त्यांच्या सिक्युरिटीत कपात करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्ट व्हॅन देखील कमी केल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे कुटुंबियांसह मातोश्रीच्या परिसरातील सुरक्षा देखील कमी करण्यात आली आहे. मातोश्रीवर मागच्या आणि पुढच्या अशा दोन्ही गेटवर पोलीस तैनात असतात. मात्र, आता ही सुरक्षा कमी करण्यात आली आहे.

सुरक्षा कपात केल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

ठाकरे कुटुंबाची सुरक्षा कपात केल्यानंतर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी या निर्णयावर टीका केली आहे. कोणतेही सरकार असले तरी त्यांनी मातोश्रीची सुरक्षा कायम ठेवली होती. आता मातोश्रीवरील मेन गेट, मागचा गेट आणि आतमधील सुरक्षा कमी केली आहे. एवढेच नाही तर ठाकरे कुटुंबाची सुरक्षा देखील कमी केली आहे. पायलट व्हॅन देखील कमी केल्या आहेत. काँग्रेसचे सरकार असले तरीही त्यांनी मातोश्रीला सुरक्षा देण्याचे काम केले होते. मिंधेनी ठाण्यात छोट्या छोट्या कार्यकर्त्याला सुरक्षा दिली आहे. मात्र मातोश्रीची सुरक्षा कमी केली आहे. सुरक्षा कमी केली असली तरी आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular