News

कोल्हापूर: आता 600 रुपये प्रति ब्रासप्रमाणे मिळणार नदीतील वाळू; 3 लाख 63 हजार टन वाळू मिळण्याची शक्यता

कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आता नदीतील वाळू उपलब्ध होणार आहे. यासाठी नागरिकांना ऑनलाईन मागणी नोंदवावी लागणार असून 600 रूपये ब्रास याप्रमाणे ही वाळू खरेदी करता येणार आहे. जिल्ह्यात तब्बल आठ वर्षांनंतर नदीतील वाळू उपसा केला जाणार असून शिरोळ तालुक्यातील सहा ठिकाणी ही वाळू उपसली जाणार आहे. यासाठी सहा सरकारी डेपो तयार करण्यात येणार असून, त्याद्वारे सरकारी दरातच ग्राहकांना ही वाळू उपलब्ध होणार आहे.

पूरप्रवण नद्यांतील गाळ काढण्याची मोहीम हाती

राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानंतर 2017 पासून जिल्ह्यात वाळू उपसा बंद करण्यात आला आहे. वाळू उपसा करण्यास बंदी घालण्यात आली असली तरी राज्य शासनाने नव्याने जाहीर केलेल्या वाळू धोरणानुसार पूरप्रवण क्षेत्रातील तसेच पुराला कारणीभूत ठरत असल्याने नद्यांतील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील नद्यांचा गाळ काढण्यात येणार आहे.

यामध्ये जिल्ह्यातील कृष्णा नदीतून वाळू उपसा केला जाणार आहे. जलसंपदा विभागाने गाळ मिश्रित वाळू काढण्यासाठी कृष्णा नदीतील शिरोळ तालुक्यातील 20 ठिकाणे निश्चित केली होती. त्यापैकी 6 ठिकाणे अंतिम पाहणीनंतर निश्चित करण्यात आली आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने देखील याला मंजुरी दिली आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून, शिरोळ तालुक्यातील घालवाड आणि अर्जुनवाड येथील प्रत्येकी दोन, कवठेगुलंद आणि शेडशाळ येथील प्रत्येकी एक अशा सहा ठिकाणी गाळमिश्रित वाळू काढण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, सप्टेंबर महिन्यात प्रत्यक्ष गाळ काढण्यास सुरुवात होईल.

जिल्ह्यात सहा ठिकाणी सरकारी वाळू डेपोही तयार करण्यात येणार आहेत. नदीतून उपसा केल्यानंतर गाळातून मिळणारी वाळू या ठिकाणी साठा करून ठेवली जाईल. ग्राहकांना ऑनलाईन नोंदणी करून मागणी करावी लागणार आहे, त्यानंतर त्याचे पैसे भरल्यानंतर संबधिताला ऑनलाईन पावती उपलब्ध होईल, ही पावती डेपोवर दाखवून वाळू नेता येणार आहे.

3 लाख 63 हजार टन वाळू मिळण्याची शक्यता

उपसा निश्चित केलेल्या सहा ठिकाणांहून सुमारे 3 लाख 63 हजार टन वाळू उपलब्ध होईल, अशी शक्यता आहे. यामुळे सुमारे 1 लाख 28 हजार ब्रास वाळू उपलब्ध होईल. ही वाळू सरकारी डेपोतून विकत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सहाशे रुपये प्रति ब्रास या हा दर नागरिकांना द्यावा लागणार आहे. ही वाळू सर्वसामान्यांनाच उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन केले जाणार आहे. मोठ्या प्रमाणात वाळू खरेदी करून व्यापार्‍यांकडून त्याचा साठा होणार नाही, याची खबरदारी घेऊनच वाळूची विक्री केली जाणार आहे.

Back to top button