कोल्हापूर, सांगली मध्ये आजपासून 5G सेवेला प्रारंभ; ग्राहकांना मिळणार विनाशुल्क 1 Gbps पेक्षा अधिक स्पीडने अनलिमिटेड डेटा | 5G Network

मुंबई | देशातील 5G सेवेचं जाळं दिवसेंदिवस विस्तारत असल्याचं पहायला मिळतय. रिलायन्सच्या जिओ कंपनीने आपलं ट्रू 5G नेटवर्क आता देशातल्या आणखी 50 शहरांत उपलब्ध करून दिलं आहे. त्यामुळे देशातल्या महत्त्वाच्या 184 शहरांमध्ये आता जिओ 5G नेटवर्कची सेवा सुरू होणार आहे. आज सुरू होणाऱ्या ट्रू 5G नेटवर्क मध्ये महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नांदेड-वाघाळा आणि सांगली या शहरांचा समावेश आहे.

कोल्हापूर आणि सांगलीशिवाय महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर आणी अहमदनगर येथे जिओ 5G सेवा सुरू आहे.

याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जिओ ची 5G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून कोल्हापूर आणि सांगली शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे. आम्ही जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह कोल्हापूर, सांगली आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्र डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.”

जिओच्या सर्व ग्राहकांना ट्रू 5G तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, यासाठी नेटवर्कमध्ये आवश्यक ते सर्व बदल करण्यात आल्याचं जिओनं म्हटलंय. डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशाला जिओ ट्रू 5G नेटवर्कचा लाभ घेता येईल, असंही जिओकडून सांगण्यात आलंय. सध्या आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गोवा, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पुदुच्चेरी, पंजाब, राजस्थान, तमिळनाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल ही राज्यं व केंद्रशासित प्रदेशांतल्या 50 शहरांमध्ये जिओनं 5G नेटवर्क सुरू केलंय. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नांदेड-वाघाळा आणि सांगली या शहरांचाही यामध्ये समावेश आहे.

या शहरांमधल्या ग्राहकांना जिओकडून वेलकम ऑफरही देण्यात आली आहे. ग्राहकांना आजपासून कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1 Gbps पेक्षा अधिक स्पीडने अनलिमिटेड डेटा उपलब्ध होईल. “देशातल्या 17 राज्यं व केंद्रशासित प्रदेशांमधल्या 50 शहरांमध्ये जिओची 5G सेवा आजपासून सुरू होतेय. त्यामुळे आता देशभरातल्या एकूण 184 शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. 5G नेटवर्कच्या विस्ताराचं हे देशातलंच नाही, तर जगभरातलंही एकमेव उदाहरण असेल,” असं जिओच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं.

जिओने आपल्या ट्रू 5G नेटवर्कबाबत काही खुलासे केले आहेत. हे नेटवर्क ट्रू 5G नेटवर्क का आहे, यामागची काही कारणंही जिओनं स्पष्ट केली आहेत. या 5G नेटवर्कचं 4G वर जराही अवलंबित्व नाही, असं कंपनीने सांगितलं. 5G स्पेक्ट्रमच्या 700 MHz, 3500 MHz आणि 26 GHz बँड्सचं सर्वांत मोठं व उत्तम एकत्रीकरण करून हे नेटवर्क तयार करण्यात आलंय. Carrier Aggregation या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या सर्व फ्रिक्वेन्सीजचं एकाच डेटा हायवेमध्ये रूपांतर होतं आणि ग्राहकांना विनाखंड अनुभव मिळतो, असं जिओने म्हटलं आहे. देशभरातल्या अनेक ग्राहकांना आता जिओच्या 5G नेटवर्कच्या सेवेचा लाभ घेता येईल.

आज (24 जानेवारी 2023) या सेवेचा शुभारंभ करण्यात आलाय. आता जिओ5G नेटवर्क गोवा, हरियाणा आणि पुदुच्चेरी या 3 नव्या राज्यांमध्ये पोहोचलं आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते आज कोटामध्ये या सेवेचा शुभारंभ होणार आहे, तर हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांच्या हस्ते हरियाणा सर्कलमधल्या 5G नेटवर्क सेवेचं उद्घाटन होणार आहे. यापैकी बहुतांश शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरू करणारी जिओ ही पहिली व एकमेव कंपनी आहे.