कोल्हापूर | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा 14वा हप्ता उद्या 11 वाजता शेतकऱ्यांचा खात्यावर जमा होणार आहे. एप्रिल ते जुलै 2023 कालावधीचा हा देय लाभ देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सीकर, राजस्थान येथून गुरुवार 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन समारंभाद्वारे वितरीत होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
या समारंभाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे आणि कृषी विज्ञान केंद्र, कणेरीमठ, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, राजर्षी शाहू कृषी महाविद्यालय, सहयोगी संशोधन संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प शेंडा पार्क, ग्रामपंचायत स्तरावरुन तसेच तालुक्यातील गावोगावी कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याकडून होणार आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्या-त्या कृषिविभाग अंतर्गत येणाऱ्या आस्थापनामध्ये अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व शेतकऱ्यांनी लाभ वितरण समारंभामध्ये http://pmindiawebcastnicin या लिंक व्दारे सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.