Weather

राज्यातील ‘या’ भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता | Weather Update 2024

मुंबई | गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होत असून थंडीत चढ उतार (Weather Update 2024) पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानात घट तर काही ठिकाणी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, राज्यात पुढील ४८ तासात मध्यम ते हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. विशेषत: कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात हा पाऊस होणार आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह देशाच्या काही भागात देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने, शुक्रवारी (ता. ५) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये तीव्र थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

Weather Update 2024

राज्यातील थंडी ओसरली असून, शुक्रवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्र व गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ६) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता कायम आहे.

कमी दाबाची रेषा लक्षद्वीप पासून उत्तर कोकणापर्यंत जात आहे तसेच उत्तरेकडून येणाऱ्या पश्चिमेकडून येणाऱ्या विक्षोभामुळे वायव्य दिशेकडून येणारे थंड वारे राज्यांमध्ये येत आहेत. बंगालच्या उपसागरामधून आग्नेय दिशेकडून येणारे वारे यांची परस्पर क्रिया म्हणजे विंड इंटरॅक्शन उत्तर मध्य महाराष्ट्र व नगरच्या भागावर होत आहे. त्यामुळे कोकण गोव्यात ६ ते ८ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

९ जानेवारी नंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात ६ ते ९ तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ९ तारखेनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील ६ ते ९ तारखेपर्यंत तर विदर्भामध्ये पुढील ४८ तासात अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर मात्र मराठवाडा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासात तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटसहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील ७२ तासात राज्यांमध्ये हलके धुके देखील पडण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३०.४ (१४), धुळे २९ (१४), जळगाव २९ (१७), कोल्हापूर २९.१ (१९.९), महाबळेश्‍वर २६.१ (१५.३), नाशिक २९.५ (१२.८), निफाड २८.५ (११), सांगली २९.४ (२०.२), सातारा ३०.२ (१७.२), सोलापूर ३२.१ (१९.३), सांताक्रूझ ३१ (१८.५), डहाणू २६.७ (१७.४), रत्नागिरी ३३.१ (२०.२), छत्रपती संभाजीनगर २९ (१५.६), नांदेड २९.६ (१८.२), परभणी २९.६ (१७.५), अकोला ३०.४ (१७.६), अमरावती २९ (१७.०), बुलडाणा २९.४ (१५.२), ब्रह्मपुरी ३०.३ (१५.५), चंद्रपूर २८.४ (१५), गडचिरोली २९ (१५.२), गोंदिया २७.८ (१४.८), नागपूर २७ (१५.५), वर्धा २७.५ (१७), वाशीम २९.६ (१५.६), यवतमाळ ३० (१५).

Back to top button