मोलमजुरी करणाऱ्यांची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक, ओबीसी मधून मिळवला 21 वा क्रमांक; वाचा तिच्या संघर्षाची कहाणी!
सिंदखेड तालुक्यातील सुवर्णा बाळू पाटील ओबीसी गटातून 21 वा क्रमांक मिळवून महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाली आहे. सुवर्णांने मिळवलेले हे यश मात्र मोठ्या संघर्षांतून मिळवले आहे. कारण तिचे आई–वडील नेवाडे येथे शेतीमध्ये मोलमजूरी करून उदरनिर्वाह करतात. त्यामुळेच सुवर्णाचे हे यश कौतुकास्पद आहे.
सुवर्णा ही त्यांच्या घरातील मोठी कन्या असून तिला आणखी दोन बहिणी आहेत. घरची परिस्थिती बेताची असल्याने सुवर्णाने घरच्या घरी अभ्यास केला आहे. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असल्याने तिने शिक्षणाची कास धरली. सुवर्णाचे शिक्षण मु.जे.महाविद्यालय जळगाव येथे झाले आहे. तर तिने एम.एस्सी. गणित विषयातुन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. सुवर्णाला तिच्या शिक्षणासाठी तिच्या मामाचीही मदत झालीय, त्यामुळे ती एवढी भरारी घेऊ शकली आहे.
कोविड-19 च्या दरम्यान लाॅकडाऊन कालावधीत मुख्य परीक्षेचा व ग्राऊंडसाठी शिवाजी महाराज स्टेडियम येथे ग्राऊंडवर सराव सुरू केला. या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यानंतर तिने नाशिक येथे स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर येथे कोच वैभव झरोवर यांचे ग्राऊंड जॉईन केले.
काहीच दिवसात सुवर्णाने ग्राऊंड क्लिअर करून, लेखी परीक्षा दिली आणि PSI पदाला गवसणी घातली. सुवर्णा महाराष्ट्र राज्यातून ओबीसी संवर्गातुन 21 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. नेवाडे गावातील पी.एस.आय.पदाकरता नियुक्त झालेली पहिलीच मुलगी असून तिच्या निवडीमुळे संपूर्ण गावात आनंद साजरा केला जात आहे.