News

राधानगरी: आईच्या डोक्यात कुदळीने वार, हल्ल्यात आईचा जागीच मृत्यु; किरकोळ वादातून घटना

राधानगरी | भाताची टोकण करताना आई, वडील आणि मुलगा यांच्यात झालेल्या किरकोळ वादातून बारडवाडी (ता. राधानगरी) येथे मुलाने आईच्या डोक्यात कुदळ मारल्याने त्या जागीच ठार झाल्याची घटना घडलीय. मालुबाई श्रीपती मुसळे (वय ६२) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा संदीप श्रीपती मुसळे (३५) याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या दरम्यान येथील सुतारकीचा माळ या शेतात घडली. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बारडवाडी येथील श्रीपती मुसळे, मालुबाई मुसळे हे पती-पत्नी आणि मुलगा संदीप हे सोमवारी सकाळी भात टोकणीसाठी सुतारकीचा माळ येथील शेतात गेले होते. काम करता-करता मुलगा आणि आई-वडील यांच्यात वाद झाला. या वादातून संदीप याने कुदळ वडिलांना मारण्याचा प्रयत्न करत असताना ती आईच्या डोक्यात लागली. घाव वर्मी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. 

घटना गावात समजताच त्या ठिकाणी लोक जमले होते. वडील आणि मुलगा दोघांनाही दारूचे व्यसन आहे. संदीप सेंट्रिंग काम करतो. मयत मालुबाई यांच्यापश्चात पती, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक आप्पासाहेब पवार, राधानगरीचे पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्यासह राधानगरी पोलिस उपस्थित होते. सोळांकुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन केल्यानंतर मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास राधानगरी पोलिस करीत आहेत.

Back to top button