News

मराठा आंदोलकाची मुंबईत आत्महत्या, सरकारने जबाबदारी स्विकारण्याची आंदोलकांची मागणी | Maratha Reservation

मुंबई | मराठा आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ते सुनील कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी दिली. त्यांनी ट्विटर (X) या समाजमाध्यमावर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.( Maratha Reservation)

आज जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनात सक्रिय युवक सुनील बाबुराव कावळे यांनी मुंबईत आत्महत्या केली. माझ्या मराठा बांधवांनो, आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छाताडावर बसून अनेक संग्राम आपल्या या लढवय्या जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका! सरकारला विनंती की, यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार आहे. मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे, हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाही तर उद्रेक अटळ आहे. हुतात्मा सुनील बाबुराव कावळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!, अशी पोस्ट विनोद पाटील यांनी केली आहे.

अशोक चव्हाण यांनी वाहिली श्रद्धांजली

“मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सक्रिय असलेले सुनील कावळे यांच्या आत्महत्येची दुर्दैवी घटना प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, कृपया कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नका. आपले आयुष्य संपवून मराठा आरक्षण मिळणार नाही, तर त्यासाठी लोकशाहीच्या मार्गाने लढा द्यावा लागणार आहे. त्यासोबतच माझी केंद्र व राज्य सरकारलाही विनंती आहे की त्यांनी मराठा कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांची गंभीर दखल घ्यावी आणि मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत”, असं ट्वीट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणावरून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण तापलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलनाची कमान आपल्या हाती घेत पुन्हा एकदा राज्यातील मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी सक्रिय केलं आहे. त्यातच, आता मराठा आंदोलकाने आत्महत्या केल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार पातळीवर काय निर्णय घेतला जाणार हे पहावं लागणार आहे.

Back to top button