मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; किडनी आणि लिव्हरला सूज | Manoj Jarange Patil
जालना | मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी 9 दिवसांनंतर आपलं उपोषण सोडलं आहे. मात्र उपोषणानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या किडनी आणि लिव्हरला सूज आली आहे. मागील उपोषणावेळच्या पेक्षा सध्या त्यांची तब्येत चिंताजनक आहे.
जरांगे पाटील यांना यावेळी अधिक त्रास झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पुढचे दोन आठवडे त्यांना हॉस्पिटलमध्येच राहावं लागणार आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वेळेच्या तुलनेत त्यांना यावेळी जास्त अशक्तपणा आहे. तसेच वजन देखील खूप कमी झालं आहे. लिव्हर आणि किडनीचे पॅरामीटर देखील डिरेंज झाले आहेत. ब्लड प्रेशरही कमी आहे. त्यादृष्टीने त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी 24 ऑक्टोबरपासून उपोषण सुरु केले होते. मराठा समाजास सरसकट कुणबी दाखले द्या, ही त्यांची प्रमुख मागणी होती. गुरुवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात जाऊन त्यांच्या चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळात निवृत्त न्यायमूर्ती एम. जे. गायकवाड आणि सुनील शुक्रे यांचा समावेश होता. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना कायदेशीर बाबी समजून सांगितल्या. आरक्षणाचा प्रश्न एक-दोन दिवसात सुटण्यासारखा नाही. न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्यासाठी थोडा वेळ लागेल. घाईघाईने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे शिष्टमंडळाने त्यांना सांगितले.
शिष्टमंडळाने सर्व बाबी पटवून दिल्यानंतर नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले. या उपोषण दरम्यान त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले नाही. गुरुवारी त्यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज असल्याची माहिती डॉ. विनोद चावरे यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणा दरम्यान खालवली होती. त्यांनी पाणी घेण्यास देखील नकार दिला होता. पोटात काहीच नसल्यामुळे त्यांना त्रास होत होता. त्यामुळे शरीरात ताकत राहिली नव्हती. त्यांना स्पष्टपणे बोलताही येत नव्हते. ग्रामस्थांनी आग्रह केल्यानंतर त्यांनी थोडे पाणी घेतले होते. परंतु या संपूर्ण उपोषण दरम्यान त्यांनी कोणतेही वैद्यकीय उपचार घेतले नव्हते.
मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची गेल्या नऊ दिवसात तपासणी झाली नव्हती. अखेर गुरुवारी उपोषण मागे घेतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीचा शुक्रवारी अहवाल आला असून त्यामध्ये त्यांच्या किडनी आणि लिव्हरवर सूज आल्याचे दिसत आहे. उपचारानंतर ते पूर्ण बरे होतील, असे डॉक्टर विनोद चावरे यांनी सांगितले.