Career

‘या’ तारखेनंतर उमेदवारांना भरता येणार प्राधान्यक्रम; 22000 पदांची या टप्प्यात भरती | Maharashtra Shikshak Bharti 2024

मुंबई | शिक्षक भरतीसाठी खासगी अनुदानित शाळांना पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी (ता. २) संपली आहे. राज्यात या टप्प्यात २२ हजार शिक्षकांची भरती होणार असून त्यात खासगी अनुदानित शाळांमधील नऊ हजार तर उर्वरित जवळपास १३ हजार पदे जिल्हा परिषदांसह महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमधील आहेत.

Maharashtra Shikshak Bharti 2024

राज्यातील सव्वालाख शाळांमध्ये (जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळा) ६७ हजारांपर्यंत शिक्षक कमी आहेत. तरीदेखील या टप्प्यात २२ हजार पदांची भरती होईल. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांपैकी ७० टक्के तर खासगी अनुदानित शाळांमध्ये ८० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली आहे. खासगी अनुदानितसह जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पदभरती ‘पवित्र’ पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे.

खासगी शाळांना एका रिक्त जागेसाठी तीन उमेदवारांची मुलाखत घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांवरील शिक्षकांची निवड गुणवत्तेनुसार थेट होणार आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी घोषणा झालेली शिक्षक भरती आता अंतिम टप्प्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी शिक्षक भरतीची कार्यवाही लवकर व्हावी, यासाठी वारंवार पाठपुरावा केला आहे.

पवित्र पोर्टलवर TET उत्तीर्ण जवळपास सव्वादोन लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या उमेदवारांमधून खासगी अनुदानित शाळांमध्ये नऊ हजार तर १३ हजार शिक्षकांची भरती जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये होईल. आता भरतीचा शेवटचा टप्पा बाकी आहे. प्राधान्यक्रम भरण्यास सात ते आठ दिवसांची मुदत उमेदवारांना दिली जाणार आहे. त्यात उमेदवारांना कोणतीही मर्यादा असणार नाही. खासगी संस्थांमध्ये भरतीस इच्छुक उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या व सोयीच्या शाळांची निवड करता येईल. जिल्हा परिषद शाळांमध्ये भरतीस इच्छुकांना कितीही जिल्हा परिषदांचा पर्याय देता येणार आहे. प्राधान्यक्रम भरण्यास ६ फेब्रुवारीनंतर सुरवात होईल आणि फेब्रुवारीअखेर भरतीची प्रक्रिया संपविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे

Back to top button