पी.एन. पाटील यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव अजूनही कमी नाही | Kolhapur News
कोल्हापूर | काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी.एन.पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असल्याचे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव थांबायला हवा होता परंतू तो अजून थांबत नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मंगळवारी सकाळी मुंबईतील प्रख्यात मेंदूशल्य चिकित्सक डॉ.सुहास बराले, राहूल पाटील यांनी ॲस्टर आधार रुग्णालयात आमदार पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांशी चर्चा केली. रविवारी सकाळी आमदार पाटील चक्कर येवून बाथरुममध्ये पडल्याने त्याचवेळी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता.
आमदार पाटील यांच्यावर रविवारी सायंकाळीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डॉक्टरांनी ७२ तासांचा अवधी काळजी करण्यासारखा असल्याचे सांगितले होते. कालच्या प्रमाणे आजही त्यांची प्रकृती स्थिर आहे. रक्तस्त्राव थांबला असता तर ते उपचाराला चांगला प्रतिसाद देतात असे म्हणता आले असते. परंतू दुर्देवाने तसे झालेले नाही. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या उपचारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.