Kolhapur Crime News : फुलेवाडीतील खूनप्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाच जणांना अटक, लक्ष्मीपुरी पोलिसांची कारवाई
कोल्हापूर | फुलेवाडीतील शेतकरी धाब्याजवळ सोमवारी (दि.13) रात्री पाठलाग करून पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषीकेश रवींद्र नलवडे (वय 30, रा. दत्त कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत) याचा अमानुषपणे खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी तीन अल्पवयीन संशयितांसह पाच मारेकऱ्यांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
कोल्हापुरात गुन्हेगारी टोळ्यांतील वर्चस्व वादातून जीवघेण्या हल्ल्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नलवडे याच्याविरोधातही गर्दी, मारामारी आणि हल्ल्याचे गुन्हे दाखल आहेत. सोमवारी रात्री नलवडे हा फुलेवाडी येथील एका हॉटेलात मद्य प्राशन करून मित्रासमवेत दुचाकीवरून जात होता.
यावेळी समोरच्या दिशेने दोन हल्लेखोर दुचाकीवरून येत असल्याचे दिसून आले. दुचाकीवरून तोंडाला मास्क बांधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी ऋषीकेश नलवडे याचा थरारकपणे पाठलाग करून त्याच्यावर तलवार, कोयता, एडक्याने हातावर, डोक्यावर पाठीवर, खांद्यावर एकापाठोपाठ एक असे सोळा खोलवर वार केले होते.
ऋषीकेश नलवडे याने हल्लेखोरांना पाहताच मित्राच्या दुचाकीवरून उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला संभाव्य हल्ल्याची चाहूल लागल्याने त्याने मित्राला चौकातील पोरं बोलावून घे, असे सांगून तो उडी टाकून पळत सुटला. त्याच्या पाठोपाठ हल्लेखोरांनीही नलवडे याचा पाठलाग केला. काही क्षणात शस्त्रधारी हल्लेखोरांनी त्याला गाठून त्याच्यावर सपासप वार केले. वर्मी घाव झाल्याने नलवडे जीवाच्या आकांताने बचावासाठी ओरडत होता. त्याच्या आवाजाने परिसरातील काही तरुण घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाच्या डोळ्यांदेखत हल्लेखोर त्याच्या शरीराची वार करीत होते. त्यामुळे हा जीवघेणा थरार पाहून जमावाने तेथून पळ काढला.