मुंबई | सध्या आरक्षणाच्या आणि जातगणनेच्या सर्व्हेवरून चांगलाच गदारोळ माजला आहे. सोशल मीडियावर अनेक जण आपला संताप व्यक्त करत आहेत. काही कलाकारांनी देखील यावर टीका करत आपली मतं सोशल मीडियावर व्यक्त केली आहेत. यातच ‘मराठी बिग बॉस’ फेम अभिनेता पुष्कर जोग याने देखील जातगणना सर्व्हेवर आपली प्रतिक्रिया दिली. या दरम्यान त्याची जीभ घसरली. अभिनेता पुष्कर जोग याने म्हटलं होतं की, ‘जातगणना करण्यासाठी आलेल्या त्या कर्मचारी बाईमाणूस नसत्या तर, २ लाथा नक्कीच मारल्या असत्या’. मात्र, आता त्याच्या याच वक्तव्यानंतर अभिनेते किरण माने यांनी पुष्कर जोगला चॅलेंज देत चांगलच फैलावर घेतलं आहे. किरण माने यांनी याबाबत त्यांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर सविस्तर पोस्ट लिहून पुष्कर जोग याला दम दिला आहे…
किरण माने यांनी लिहिलेली पोस्ट वाचा जशीच्या तशी ?
“आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ‘आमचीच सत्ता’ हा पोकळ माज आलाय…” मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो.
दुसर्याच दिवशी पुष्कर जोग नांवाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्यानं विधान केलं, “जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या.”
अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे.
तुला लाथाच घालायच्यात ना???
लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा???
… मी तुला चॅलेंज देतो.. ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल. खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्याकडून चार लाथा खायच्या.
बोल…
आहे दम तुझ्या पार्श्वभागात???
अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्या कर्मचार्यांवर कसला माज दाखवतो तू??? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा.
बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा.
मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा.
– किरण माने.