दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिषी मार्लेना; नव्या मंत्रिमंडळात ‘या’ आमदारांचा समावेश, जाणून घ्या | Delhi CM Atishi
नवी दिल्ली | दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आतिषी मार्लेना (Delhi CM Atishi) यांचा शपथविधी आज (शनिवार) पार पडला. यावेळी नवं मंत्रीमंडळही स्थापन करण्यात आलं असून 5 नव्या मंत्र्यांचे शपथविधी देखील पार पडले. राजभवनात नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
‘हे’ आहेत दिल्लीच्या आतिषी सरकारमधील नवे मंत्री
दिल्लीच्या नव्या सरकारच्या प्रमुख अर्थात मुख्यमंत्री म्हणून आतिषी मार्लेना असतील. त्यांच्या मंत्रिमंडळात सौरभ भारद्वाज, गोपाल राय, मुकेश अहलावत, इम्रान हुसैन, कैलाश गहलोत या आम आदमी पार्टीच्या आमदारांनी मंत्रिपदाच्या शपथा घेतल्या आहेत.
नव्या मंत्रीमंडळात केजरीवाल सरकारमधील मंत्री असलेले खुद्द अरविंद केजरीवाल, मनिष सिसोदिया, संजय सिंह यांचा मात्र नव्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेला नाही. या तिन्ही नेत्यांवर सध्या दिल्लीच्या अबकारी कर घोटाळ्यात ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. सध्या हे तिघेही न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर जामिनावर बाहेर आले आहेत.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आठवड्याभरापूर्वी आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासूनच नवा मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगली होती. अखेर खुद्द केजरीवाल यांनीच मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री राहिलेल्या आतिषी मार्लेना यांच्या नावाची घोषणा केली होती.
केजरीवाल यांच्यासह मनिष सिसोदिया हे प्रमुख नेते तुरुंगात असताना आतिषी यांनी दिल्ली सरकारचा कारभार चांगल्या प्रकारे चालवला होता. तसंच आपल्या नेत्यांची बाजू त्यांनी आक्रमकपणे लावून धरली होती. आतिषी यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप झालेले नसल्यामुळं मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे.